Skip to main content

संपादकीय

संपादकीय


शाहू जयंतीच्या निमित्ताने हा पहिला अंक आपल्या हाती सुपूर्द करताना अतिशय आनंद होत आहे. असा दुर्मिळ योग योगायोगानेच पदरात पडावा यासारखे सुदैव नाही. या निमित्ताने आजच्या या अंकात जास्तीत जास्त सामाजिक विषयावर लेखन घेतले आहे. यामध्ये शाहू महाराज यांच्या जीवनाचा थोडक्यात आढावा घेणारा लेख सर्वांनी आवर्जून वाचवा. शाहू राजांचे आयुष्य तरुणांना एक आदर्श आहे. सर्व सत्ता, सुखे, संपत्ती असतानासुद्धा एक संयमी व कणखर नेतृत्व उभे करून शाहू राजांनी आदर्श घालून दिला आहे. हे शाहू चरित्र आजच्या उच्छृंकुल तरुणाईला निश्चित मार्गदर्शक आहे. अर्थात, महान राष्ट्रपुरुषांची चरित्रे नेहमीच समाजाला मार्गदर्शक असतात. पण समाजानेही वेळोवेळी त्याचा अभ्यास व उपासना करणे गरजेचे आहे. आजकाल राष्ट्रपुरुष केवळ राजकीय स्वार्थासाठी भांडवल म्हणून वापरण्याचा ट्रेंड वाढत चालला आहे. अशा वेळी हा विचार सध्याच्या वाचकांच्यापुढे ठेवणे अतिशय मोलाचे व गरजेचे वाटते. तरुणांना दिशा देवून सक्षम समाज घडवला नाही तर काय घडू शकते याचे उत्तम उदाहरण म्हणजे सध्याची राजकीय व सामाजिक स्थिती आहे. आज प्रत्येकजण जाती धर्मात तेढ वाढविण्याचे व आपला मतांचा गठ्ठा साबूत ठेवण्याच्या नादात आहे. यामुळे, समाज कुठपर्यंत घसरत चालला आहे, हे पहिलेच जात नाहीय. त्यामुळे, एक वैचारिक लढाई पुन्हा एकदा उभारण्याचे कार्य आजच्या युवकांनी हाती घेणे क्रमप्राप्त आहे. अन्यथा, उद्या जाऊन जर काही विचित्र घडू लागले, तर, हि चूक समाजाची किंवा सरकारची नाही तर, आपल्या नाकर्तेपणाची आहे, हेही जाणून घ्यायला हवे. म्हणून, योग्य वेळी, योग्य पावले उचलली गेली पाहिजेत.

राजर्षी शाहू नावाचे एक आदर्श जीवन आपल्या कोल्हापूरच्या इतिहासात घडून गेले. त्यांनी आपल्या हातांनी हे कोल्हापूर घडविले, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. जगाच्या नकाशावर अनेक बाबतीत पुरोगामी व आदर्श असे बिरूद मिरविणारे कोल्हापूर आज कुठे आहे, याचा विचार अवश्य व्हावा. तसे बघायला गेले तर, स्वातंत्र्यपूर्व काळात शाहूंच्या रूपाने कोल्हापूरला एव वरदान लाभले . सर्वच क्षेत्रात शाहूंनी खूप मोठी आघाडी कोल्हापूरला मिळवून दिली. पण, तद्नंतर ती जपणे व टिकविणे आमच्या राजकीय मंडळीना व पर्यायाने आम्हाला जमले नाही. यासारखी दुसरी खंत व शल्य नाही. याला जबाबदार जसे राजकारणी मंडळी आहेत तेवढीच आम्ही सुस्तावलेली जनताही आहे. आम्ही कधी डोळसपणे समाजाकडे पहिलेच नाही. कधी समाजाचा विचार करून मत दिलेच नाही. कधी पुरोगामी कोल्हापूर आमच्यात भिनू दिलेच नाही. गावकुसाबाहेर घडणाऱ्या बऱ्यावाईट गोष्टींचा आमच्या कौटुंबिक गोष्टींवर परिणाम होऊच दिला नाही. मी, माझे शेत, माझे घर या पलीकडे जाऊन माझे गाव, माझा समाज, माझे कोल्हापूर असा व्यापक विचार कधी केलाच नाही. परिणामत: एके काळी अतिशय प्रगतशील म्हणविले जाणारे कोल्हापूर आज किरकोळ कारणांनी गाजत आहे.

असो, तर, शाहू जयंतीचे औचित्य व त्यायोगे सामाजिक विषयावर भरपूर लेख या अंकात देत आहोत. ते यासाठीच की आम्ही तरुणांना समोर ठेवून हे मासिक तयार केले आहे. अशा सजग व जिवंत तरुणाईने अत्यंत चांगले ज्ञान घेतलेच पाहिजे. आज सोशल मिडीयाच्या माध्यमातून बऱ्याच वाईट गोष्टी सहजपणे समाजात पसरवल्या जाताहेत. आणि हे काम फार मोठ्या प्रमाणावर आजची तरुणाईच करत आहे. आज दिवसाकाठी पाच ते सहा तास मोबाईलवर घालविणारी मंडळी चौकाचौकात दिसत आहेत. तीच तरुणाई आम्हाला समाज घडविण्यासाठी हवी आहे. त्यांनीच हा अंक व यापुढील सर्व अंक आवर्जून वाचावेत. त्यांच्या महिन्याच्या दीडशे तासांपैकी केवळ एक तास त्यांनी आमच्या या मासिकाचे वाचन करावे, या हेतूने आम्ही ते त्यांच्याच मार्गे वितरीत होईल अश्या पद्धतीने तयार केले. आणि मग हे इ मासिक तयार झाले. हे सहज व कुठेही वाचता येईल. व कुणालाही कधीही पाठवताही येईल. एक चांगले काम करायची एक संधी सर्वांनाच उपलब्ध होत आहे. 

यातून आम्ही हाच संदेश देवू इच्छितो की, समाज घडला तर मी आणि माझे कुटुंबही चांगले घडेल. कारण गल्लीत उच्चारली जाणारी शिवी उद्या माझ्या घरात उच्चारली जाऊ शकते. ती नको असेल तर केवळ मी माझ्या घरात बंधने न घालता, गल्लीलाच माझे घर बनवून ती सुधारली पाहिजे. आणि तेच काम आम्ही करत आहोत. या चळवळीत सर्व सजग वाचकांनी सामील व्हावे आणि एक सक्षम समाज तयार करण्यास आम्हाला मदत करावी.

---------------

Comments

Popular posts from this blog

ऑगस्ट २०१७: अंक तिसरा (स्वातंत्र्यदिन विशेषांक

हा अंक डाऊनलोड करण्यासाठी या मुखपृष्ठावर क्लिक करा.

गझलनिष्ठ प्रातिनिधिक इ गझल संग्रह ऑगस्ट-सप्टेंबर १७

इमेज वर क्लिक करून गझलनिष्ठचा प्रातिनिधिक इ गझल संग्रह ऑगस्ट-सप्टेंबर १७ डाऊनलोड करून घ्या... गझलनिष्ठ प्रातिनिधिक इ गझल संग्रह ऑगस्ट-सप्टेंबर १७ इमेज वर क्लिक करून गझलनिष्ठचा प्रातिनिधिक इ गझल संग्रह ऑगस्ट-सप्टेंबर १७ डाऊनलोड करून घ्या...

ऑगस्ट २०१७ : अंक दुसरा

... या मुखपृष्ठावर क्लिक करून आमचा ऑगस्ट २०१७ चा अंक डाउनलोड करा.. ....                                     या मुखपृष्ठावर क्लिक करून आमचा ऑगस्ट २०१७ चा अंक डाउनलोड करा.. .....